नांदेड जिल्ह्यात "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त ऐतिहासिक भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ जानेवारी २०२६ रोजी मौजे आसर्जन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्याचे स्मरण करणे .  धर्मरक्षणासाठी आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले बलिदान दिले. त्यांचा गौरवशाली इतिहास, त्यांनी दिलेले बलिदान आणि समाजातील त्यांचे कार्य सर्वांना माहित व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाभरातील शाळांचा सहभाग

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकार्यांना या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आदेश दिले आहेत. सर्व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि महाविद्यालयांमध्ये (अनुदानित, विनाअनुदानित व अल्पसंख्याक दर्जा प्राप्त) विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जनजागृती मोहीम

१५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हाभरात प्रभातफेरी काढण्यात येणार आहेत. या प्रभातफेऱ्यांमध्ये "हिंद दी चादर, श्री गुरु तेग बहादुर", "शीश कटे पर पीछे ना हटे, धर्म के खातीर मर मिटे", "गुरु की शहादत याद करो, मानवता की राह धरो" अशा घोषवाक्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

शाळांमध्ये सकाळी परीपाठच्या  वेळी गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्यावरील गाणी वाजवून कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना गुरुजींच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात येत आहेत.

शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

१५ ते १७ जानेवारी दरम्यान तालुकास्तरावर चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धांचे विषय गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवन, शिकवणी, बलिदान आणि मानवतावादी दृष्टिकोन यावर आधारित आहेत.

२० जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धा गुरुग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूल जवळ, हिंगोली गेट येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सहा समाजांचे नाते

या कार्यक्रमाद्वारे सिख, सिकलीकर, बंजारा, मोहियाल, सिंधी आणि लबाना या सहा समाजांचे श्री गुरु तेग बहादुर यांच्याशी असलेले ऐतिहासिक नाते प्रकाशात आणण्यात येत आहे. भाई सती दास, भाई मती दास आणि भाई दयाला यांच्या शहादतीचेही स्मरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी विशेष संकेतस्थळ https://gurutegbahadurshahidi.com तयार करण्यात आले आहे. विद्यार्थी या संकेतस्थळावर स्पर्धेत सहभागाची नोंदणी करून प्रशस्तीपत्र मिळवू शकतात. शाळांनी घेतलेल्या विविध उपक्रमांच्या नोंदी या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर Facebook, Twitter (X), Instagram आणि YouTube या माध्यमांवर या कार्यक्रमाचा व्यापक प्रचार करण्यात येत आहे.

पथनाट्य आणि प्रदर्शने

गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित पथनाट्ये आयोजित करून त्याच्या व्हिडिओ क्लिप्स अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळांमध्ये भित्तिपत्रके लावून विद्यार्थ्यांना गुरुजींच्या शिकवणी आणि सुविचारांची माहिती दिली जात आहे.

आवाहन

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्यांना या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नांदेड जिल्ह्याची सक्रियता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माहितीसाठी संपर्क:
शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जिल्हा परिषद, नांदेड
संकेतस्थळ: https://gurutegbahadurshahidi.com