शैक्षणिक कामकाज नियोजन कॅलेंडर २०२६-२७ : विद्यार्थी गुणवत्ता वाढीवर भर

लेखक: संपादक यांनी गुरुवार, 06/08/2026 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
शैक्षणिक कामकाज नियोजन कॅलेंडर २०२६-२७ : विद्यार्थी गुणवत्ता वाढीवर भर

   महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक नियोजनात आता आणखी सुस्पष्टता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून शैक्षणिक कॅलेंडर २०२६-२७ प्रसिद्ध करण्यात आला असून, राज्यातील सर्व स्तरांवरील शाळा आणि शिक्षण विभागाला त्यानुसार कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा कॅलेंडर केवळ शाळांसाठीच नसून, राज्य पातळीपासून ते खालच्या पातळीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.


कॅलेंडरचे महत्त्व आणि उद्दिष्टे : 
कोणतेही शासकीय किंवा शैक्षणिक काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर पूर्ण होण्यासाठी पूर्व-नियोजन अत्यंत आवश्यक असते. या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या 'शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७' मध्ये दैनंदिन कामकाज आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेला महिनानिहाय करावयाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रमांची पूर्वकल्पना देऊन, वेळेची बचत आणि अचूकता साधणे हे या कॅलेंडरचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळा पातळीवर विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या सर्व उपक्रमांचे योग्य कारे वर्गीकरण करून, महिनानिहाय नियोजन करण्यात आले आहे. यामुळे राज्य पातळीपासून ते शाळा पातळीपर्यंतच्या सर्व घटकांमध्ये उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत एकात्मता निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नियोजनाची विभागणी आणि अंमलबजावणी
शैक्षणिक कामकाज नियोजन कॅलेंडरची विभागणी तीन प्रमुख टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे:
•दैनंदिन करावयाची कामे
•दरमहा करावयाची कामे
•महिनानिहाय आठवडानिहाय करावयाची कामे/ उपक्रम
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांनी (प्राथमिक, माध्यमिक, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी अनुदानित) या कॅलेंडरमध्ये निर्दिष्ट केलेल्या उपक्रमांचे आवश्यक नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील संबंधित कार्यालयांनी व अधिकाऱ्यांनी या नियोजनानुसार आवश्यक पत्रव्यवहार, निधी वितरण, सूचना, मार्गदर्शन आणि आढावा यांसारखी कार्यवाही करावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.
विद्यार्थी गुणवत्ता आणि पर्यवेक्षणात वाढ:
या नवीन कॅलेंडरमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळणार आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांची भावी अंमलबजावणी वेळेत होण्यामुळे विद्यार्थ्यांच्या अधिगम स्तरात व गुणवत्तेत निश्चित सुधारणा साध्य होईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, पर्यवेक्षकीय यंत्रणेला शाळा भेटी दरम्यान नक्की कोणत्या घटकांचा किंवा उपक्रमांचा आढावा घ्यायचा आहे, याचे स्पष्ट उद्दिष्ट मिळणार असल्याने शासकीय नियंत्रण अधिक मजबूत होईल.
शिक्षण आयुक्तालयाच्या या निर्णयानुसार, सर्व शैक्षणिक आणि शासकीय योजनांची उद्दिष्टे विहित कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी उपक्रमांपासून वंचित राहणार नाही, हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी आणि शाळांनी या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तत्परतेने कामकाज सुरू करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

लेखनविषय: शैक्षणिक वार्ता
लेखनप्रकार लेख
टॅग:
वाचने 183
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

हा लेख वाचून शैक्षणिक दिनदर्शिकेबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. शिक्षक म्हणून वर्षभराचे नियोजन करताना यातील माहिती खूप उपयोगी पडेल असे वाटले. मांडणी सोपी आणि समजण्यास सुलभ असल्यामुळे संपूर्ण लेख आवडीने वाचला. मी स्वतः ही माहिती माझ्या नियोजनात वापरणार आहे. अशा उपयुक्त आणि दर्जेदार शैक्षणिक लेखांसाठी लेखकांचे मनापासून आभार.

प्रतिसाद देण्यासाठी लॉग इन करा किंवा सदस्य व्हा